...तरीही पुन्हा अंकुरते ती
...तरीही पुन्हा अंकुरते ती यशवंती शिंदे, कोल्हापूर ताई, खूप मारतो गं तो. हातात येईल त्या वस्तूने मारतो. परवा तर त्याने उसाने मारले गं. उसाच्या चिंध्या झाल्या तरी तो मारत होता. माझ्या डोक्यात खोक पडली, अंगावर सगळीकडे वळ उठलेत, असं म्हणून रडत रडत ती अंगावरचे काळेनिळे व्रण दाखवत होती. एकदा तर माझ्यावर रॉकेलचा सगळा डबाच त्याने उपडा केला होता गं. अचकट विचकट शिव्या देतो. केस विंचरून, व्यवस्थित नीटनेटकं राहिलं की म्हणतो, कुणाला दाखवायला नटलीस गं एवढं? कोण भेटायला येणार आहे तुला? मला तू आवडत नव्हतीस, तुझा बाप भरपूर हुंडा देत होता आणि माझ्या आईबापांनी तुझ्याशी लग्न करायला लावलं म्हणून लग्न केलं. तुझ्या बापाकडे भरपूर पैसा आहे ना, जा की त्याच्याकडे, असं म्हणतो. ती- समाजातील कौटुंबिक हिंसाग्रस्त स्त्रीचे एक प्रातिनिधिक उदाहरण. तिच्यासारख्या अनेक मुली आपल्याला समाजात दिसून येतात. एकुलता एक मुलगा आहे, शेती बागायती आहे, कुटुंब सधन आहे असा विचार करून मुलींची लग्ने लावून दिली जातात. तिचा संसार सुखाचा होईल म्हणून लग्नाच्या वेळी रग्गड हुंडा देऊन आईबाप मुलीचे लग्न लावून देतात! ...