...तरीही पुन्हा अंकुरते ती

 ...तरीही पुन्हा अंकुरते ती

यशवंती शिंदे, कोल्हापूर


ताई, खूप मारतो गं तो. हातात येईल त्या वस्तूने मारतो. परवा तर त्याने उसाने मारले गं. उसाच्या चिंध्या झाल्या तरी तो मारत होता. माझ्या डोक्यात खोक पडली, अंगावर सगळीकडे वळ उठलेत, असं म्हणून रडत रडत ती अंगावरचे काळेनिळे व्रण दाखवत होती.

एकदा तर माझ्यावर रॉकेलचा सगळा डबाच त्याने उपडा केला होता गं. अचकट विचकट शिव्या देतो. केस विंचरून, व्यवस्थित नीटनेटकं राहिलं की म्हणतो, कुणाला दाखवायला नटलीस गं एवढं? कोण भेटायला येणार आहे तुला? मला तू आवडत नव्हतीस, तुझा बाप भरपूर हुंडा देत होता आणि माझ्या आईबापांनी तुझ्याशी लग्न करायला लावलं म्हणून लग्न केलं. तुझ्या बापाकडे भरपूर पैसा आहे ना, जा की त्याच्याकडे, असं म्हणतो.  

ती- समाजातील कौटुंबिक हिंसाग्रस्त स्त्रीचे एक प्रातिनिधिक उदाहरण. तिच्यासारख्या अनेक मुली आपल्याला समाजात दिसून येतात. एकुलता एक मुलगा आहे, शेती बागायती आहे, कुटुंब सधन आहे असा विचार करून मुलींची लग्ने लावून दिली जातात. तिचा संसार सुखाचा होईल म्हणून लग्नाच्या वेळी रग्गड हुंडा देऊन आईबाप मुलीचे लग्न लावून देतात!  

लग्नानंतर बर्‍याच मुलींना शारीरिक, मानसिक छळाला सामोरे जावे लागते. माहेरच्यांना घालून पाडून बोलणे, तिच्या व्यक्तिगत दिसण्यावर बोट ठेवणे, रंगाला नावे ठेवणे असे प्रकार केले जातात. कित्येकींना मुलगीच झाली म्हणून अपमानित केले जाते. मुलगा व्हावा किंवा मुलगी हे कुठल्याही प्रकारे स्त्रीच्या (आणि पुरुषाच्याही) हाती नसते हे साइंटिफिकली सिद्ध झालेलं असतानासुद्धा तिला मानसिक त्रास दिला जातो. तिला मारहाण करण्याचे प्रकार तर सररासपणे पाहायला मिळतात.

बर्‍याच गोष्टी फार नरड्याला आल्या तरच ती इतरांना सांगते. अन्यथा कुठलीही स्त्री आपल्यावर कितीही अत्याचार झाले तरी आपल्या नवर्‍याविषयी काहीही वाईटसाईट (अगदी खरं असलं तरी) कुणाजवळ सांगत नाही. तिला माहीत असते, आपल्या नवर्‍याविषयी आपण काही सांगत बसलो तर त्याची अब्रू जाणार, पर्यायाने आपलीही अब्रू जाणार. मग ती गप्प राहणंच पसंत करते. चेहर्‍यावर उसने अवसान आणून हसते. सर्वांमध्ये मिसळते आणि जणूकाही सर्व नॉर्मलच चालू आहे असं दाखवते. 

या सगळ्या गोष्टी माहेरी सांगाव्या तर आईबाप झुरणीला लागतील, म्हणून ती गप्पच बसते. तरीही तिने माहेरी काही सांगितले तर तुझ्या नवर्‍यानंच मारलंय ना, मग काय हुतंय? नवरा मारेलही आणि प्रेमही करेल!, अमुक अमुक मुलीला तर किती त्रास देतात, तुला तेवढा तर त्रास नाही ना?, पोरीच्या जातीला सहन करावंच लागतं, चार दिवस असतात बाई, मुलं मोठी झाली की, तो ताळ्यावर येईल, जरा कळ काढ इत्यादी सल्ले दिले जातात. लग्न झालेली लेक माहेरात राहणं म्हणजे आईबापाच्या छातीवरील सुरा असतो, असे सांगून माहेरचा दरवाजा आता आपल्यासाठी परका असल्याचे अप्रत्यक्षरीत्या बजावले जाते. चार दिवस माहेरी ठेवून घेतले जाते आणि पुन्हा सासरी सोडले जाते. जाताना आपल्या आईबापाच्या नावासाठी सहन कर बाई! असं तिला समजावलेलं असतं.

तरीही एखादीला असह्य त्रास होऊ लागतो आणि ती कायमची माहेरी येते. माहेरी आल्यानंतरचे पहिले सहानुभूतीचे नऊ दिवस आहेत, तोपर्यंत तिला सगळे जपत असतात. परंतु ती कायमची इथेच राहणार आहे, हे लक्षात आले की, एरवी तायडे, तायडे करणारा भाऊसुद्धा मुका होतो. मीच सगळं करायचं का, मला काय जीव आहे का नाही? असं म्हणत भावजय कामामध्ये बरोबरी करू लागते. मग तिला माहेरी कामाला जुंपून घ्यावे लागते. आईवडिलांना कितीही वाईट वाटत असले तरी ते स्वतःच आयुष्याच्या सायंकाळाकडे झुकल्यामुळे परावलंबी झालेले असतात. त्यात भर म्हणून आपली लेक आपल्या मुला-सुनेच्या जिवावर पोसायला लागते हे पाहून तेही लाचार होतात. भावाच्या आणि आपल्या मुलांच्या पालनपोषणातील दुजाभाव तिला खुपायला लागतो. मग ती हरते आणि कुठेतरी असेच जगायचे आहे तर तिथे का नको? असं म्हणत एक पाऊल मागे घेते आणि परत नांदायला जाते.

ती सासरी जाते, पुन्हा रहाटगाडगे सुरू. या सगळ्या दुष्टचक्राचा परिणाम तिच्या आरोग्यावर तर होतोच, पण बरेचदा ती मानसिकदृष्ट्या खचते. आत्महत्येसारख्या मार्गाला प्रवृत्त होते. आपलंच नशीब वाईट, आपल्या मागच्या जन्मीच्या कर्माची फळं आपण भोगतोय असं म्हणून दैवाधीन होते. अंधश्रद्ध बनते, देवाधर्माच्या नादी लागते, त्यातून तिचे जे शोषण होते, तो वेगळाच विषय आहे. 

कायद्याने स्त्रीला कितीही सुरक्षा दिलेली असली तरी अशा केसेसमध्ये पोलिसांत तक्रार देऊन काहीही उपयोग होत नाही, उलट त्रास वाढण्याचाच धोका संभवतो. शिवाय पुन्हा त्याच घरात जाऊन राहायचे असल्यामुळे हा मार्ग शक्यतो कुणीही पत्करत नाहीत. पर्मनंटली सुटका करून घ्यायची असेल तर घटस्फोट हा एकच मार्ग स्त्रीकडे उरतो; परंतु घटस्फोटित स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तितकासा चांगला नसतो. घटस्फोटितेचे जीवन आणि विधवेचे जीवन यांत फारसा फरक नसतो. त्यात पुन्हा मुलांची फरपट वेगळीच. शिवाय स्त्रिया या अवस्थेत इतक्या खचलेल्या असतात की, त्यातून उठून नव्याने आयुष्य सुरू करण्यात फारच कमी जणी यशस्वी होतात. बर्‍याच जणींचे मानसिक संतुलन ढासळते.

एक तर आर्थिकदृष्ट्या परावलंबित्व, आपण आपल्या नवर्‍याच्या घरात राहतो ही पदोपदी करून दिली जाणारी जाणीव, माहेरचे कितीही प्रेम करत असले तरी आता तेच तुझं घर आहे, तू माहेरची पाहुणी झालीस या शब्दांतून येणारा उपरेपणा यांमुळे ती अस्वस्थ होते. 

आपल्या समाजातील या गोष्टींना कधी संपणार? स्त्री म्हणजे आपल्या मालकीची वस्तू ही मानसिकता कधी बदलणार? ज्या जोडीदाराबरोबर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहिली, त्याने मारहाण करून निर्जीव झालेल्या मन आणि हृदयाने ती त्याच्याबरोबर कशी राहत असेल? मुलीचं लग्न झालं की, तिला आम्ही सांगेल तसंच तिने वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, दिसलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे असा सासरच्यांचा अट्टाहास असतो. 

काळ बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे; पण स्त्रीच्या नशिबाचे भोग काही कमी झालेले नाहीत. रोज वर्तमानपत्र उघडलं की, किमान एखादी तरी बातमी स्त्रीवरील अत्याचाराची असतेच. आजही ही स्थिती फारशी बदललेली नाही. स्त्री हा समाजातला आणि आपल्या लोकसंख्येतला अर्धा तसेच महत्त्वाचा भाग आहे. तीही आपल्यासारखीच माणूस आहे. ती उपभोगाची वस्तू नाही, ती विचार, भावना, इच्छा-आकांक्षा असलेलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, याचा स्वीकार कधी होणार? तिच्या शरीरावरच्या जखमांचे व्रण संपून जात असतील, पण मनावर झालेल्या घावांचे काय? मारहाण, अपमान सहन करून आपला मेलेला आत्मा ती कसा जिवंत करत असेल? वेदनेचे असंख्य डंख पचवूनही ती पुन्हा कोणत्या विश्वासावर अंकुरत असेल? याचाच मी विचार करते!  

Comments