सण-उत्सवात ती कुठे आहे?
सण-उत्सवात ती कुठे आहे?
यशवंती शिंदे, कोल्हापूर
ऋतुमान बदलेल, तसा हवामानतही बदल होत जातो. त्यानुसार भारतीय परंपरेत विविध सण-उत्सव येत असतात. त्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत बदल होत असतात. सण म्हटला की, मुख्यत्वे स्त्रियांच्या कामांमध्ये खूप वाढ होते. दररोजचं काम असतं ते असतंच; परंतु सणाच्या निमित्ताने येणार्या पूजा-अर्चा, उपासतापास, धार्मिक कर्मकांडे, साफसफाई यांचा अधिकचा बोजा स्त्रियांवर वाढतो. यात पुन्हा मुहूर्त किंवा ठरावीक वेळ पाळणे महत्त्वाचे असते. म्हणजे ती वेळ गाठण्यासाठी तिची तारेवरची कसरत होते. बर्याच जणी सरावाने यामध्ये पारंगत झालेल्या असतात; पण सुरुवात करताना तिची जी दमछाक होते, ती जिने अनुभवली आहे, तीच जाणो!
हे सगळे वास्तव असले तरी मला एका वेगळ्याच गोष्टीकडे माझ्या मैत्रिणींचे (आणि मित्रांचेही) लक्ष वेधायचे आहे. आपल्या भारतीय परंपरेत येणारे बरेचसे सण, उत्सव हे पुरुषकेंद्रित किंवा पुरुषाला केंद्रस्थानी ठेवून पुरुषांचे महत्त्व वाढविणारे असे आहेत. तुम्ही म्हणाल, हे कसं काय? आपले सण डोळ्यांपुढे आणून पाहा, म्हणजे तुम्हाला मी काय म्हणत आहे ते पटेल. मी काही ठळक उदाहरणे सांगते. आपण दिवाळीपासून सुरुवात करू या. दिवाळीत बलिप्रतिपदा/पाडवा असतो. या दिवशी पत्नी पतीला (घरच्या धन्याला) ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. (हा घरचा धनी बहुधा पुरुषच, ती धनीण नसते!) त्याच्यानंतर भाऊबीजेचा सण येतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करते. पुढे जानेवारीत येणारा मकरसंक्रांतीचा सण आहे. या सणालादेखील स्त्रिया सवाष्णीला (जिचा नवरा जिवंत आहे तीच सवाष्ण- म्हणजे पुन्हा पुरुष केंद्रस्थानी) वाण देऊन ओटी भरल्याशिवाय जेवण करत नाहीत. माझ्या धन्याला आवुक लाभू दे, अशी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पतीसाठी स्त्रिया वडाला दोरा बांधून प्रार्थना करतात, त्यासाठी उपास करतात. दसर्याला सीमोल्लंघनाला पुरुष जातात.
श्रावण महिन्यात तर सणावारांची गर्दी असते. त्यामध्ये नागपंचमीला भावासाठी उपवास असतो. ज्या स्त्रीला भाऊ नाही, तिने नागाला आपला भाऊ मानून त्याच्यासाठी उपास करायचा असतो. यामध्ये कृषिपरंपरेला अनुसरून साप हा शेतकर्यांचा मित्र आहे, म्हणून त्याची पूजा केली जाते हा भाग वेगळा; पण साप/नागाला भाऊ मानलेले आहे, बहीण मानलेले नाही, हे महत्त्वाचे. हरितालिकेला कुमारिका मुली आपल्याला इच्छित असा वर मिळावा म्हणून उपास करतात, तर जिचे लग्न झाले आहे ती मिळालेल्या वरासाठी- त्याच्या दीर्घायुरारोग्यासाठी उपास करते. पुढे राखीपौर्णिमा येते. त्यामध्येदेखील बहीण भावाला राखी बांधते, तिचे रक्षण कर म्हणून त्याला ओवाळते (कित्येकदा कुटुंबातील बहीण स्वतःच कुटुंबाला पोसत असते).
मला जितक्या गोष्टी ठळकपणे आठवल्या, त्या मी मांडत आहे. आता तुम्ही म्हणाल, आपल्या जन्मापासून या गोष्टी आपण बघत आलेलो आहोत, त्या आपल्या परंपरेचाच भाग आहेत. यात नवल काय किंवा पुरुषकेंद्रितपणा कुठे आला? पुरुषांसाठीच्या उपासतापास किंवा व्रतांच्यावर माझा आक्षेप नाही किंवा त्यांचे आयुष्य, आरोग्य वाढण्यासाठी केलेल्या उपासांवरही माझा राग नाही (असे उपवास केल्याने ते खरेच वाढते का? का वेगळा अभ्यासाचा विषय!). माझा मुद्दा आहे की, हे सर्व सण पुरुषांच्याच आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आहेत आणि ते सर्व स्त्रियांनी करायचे आहेत, त्यामागे काही कर्मकांड आहे, उपास आहेत. मग स्त्रियांना दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची गरजच नाही काय? की त्या सुपरवुमन आहेत आणि त्यांना असल्या गोष्टींची गरज नाही! त्यांच्यासाठी कोण व्रत, उपास करणार? वर्षातला एखादा तरी सण स्त्रीचं, पत्नीचं, बहिणीचं, आईचं आयुष्य वर्धित करण्यासाठीचा असावा.
आता कुणाला तरी वाटेल की, काय हा बालिशपणा? असं कुठं होत असतं का? आणि कशाला नेहमी पुरुषांची बरोबरी पाहिजे? काही गोष्टी निसर्गतःच असतात, जसं की स्त्री आणि पुरुष. मग ही बरोबरी कशी होऊ शकेल? मी म्हणते, का होऊ नये? म्हणजे मला तरी वाटतं की, कधीतरी आपल्यालाही आपल्या भावाने ओवाळावे अशी एखादी बहीणबीज असावी. पतीने पत्नीला कौतुकाने ओवाळणारी एखादी प्रतिपदा असावी. नागपंचमीला भावाचा उपवास केला जातो, तशी कुठलीतरी पंचमी असावी आणि भावाने बहिणीचा उपवास करावा. हरितालिकेसारखा दुसरा कुठला तरी सण असावा, जो इच्छित पत्नी मिळण्यासाठी केला जाईल. हीच पत्नी मिळावी म्हणून कुठल्या तरी वृक्षाची पूजा करणारी पौर्णिमा असावी. त्या दिवशी पुरुषांनी व्रतस्थ राहावे. मकरसंक्रांत हा सौभाग्याचा सण, सुवासिनींचा सण मानला जातो. तसा एखादा दिवस ज्याची पत्नी जिवंत आहे, त्या पुरुषाने ओवसा घ्यावा आणि आपण सौभाग्यशाली आहोत असे दाखवावे. राखीपौर्णिमेला भावाने बहिणीला राखी बांधावी आणि बहिणीकडून ओवाळणी घ्यावी. सीमोल्लंघनाला सगळ्या महिलाच जातील, असा एखादा विजयादशमीचा सणही असावा.
या सर्व गोष्टी केल्याने खरंच काही लाभत असेल किंवा स्त्रियांना विशेष असे काहीतरी प्राप्त होईल, असे नक्कीच नाही; पण ज्यामध्ये ती केंद्रस्थानी असेल, अशा समानतेच्या दृष्टिकोनातून विचार करता तिच्यासाठीही कोणीतरी असले तिला महत्त्व देणारे काही केले तर तिला किती भारी वाटेल ना!
आपल्या आजूबाजूचे जग भराभर बदलत आहे, अगदी सर्वांगाने! मग आपणही आपल्या काही प्रथा-परंपरांच्यामध्ये थोडासा बदल करून सर्वसमावेशक आणि परिपूर्ण असा दृष्टिकोन देऊ या ना! तिला तू आमच्यासाठी महत्त्वाची आहेस. जन्मोजन्मी (पुनर्जन्म नसला तरीही) तूच- आज बहीण असलीस तर बहीण, पत्नी असलीस तर पत्नी, आई असलीस तर आई म्हणून लाभावीस म्हणून तिच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करू या. मी तर म्हणते, तिच्यासाठी उपाशी राहून कुठलाही उपवास करू नका, सगळं काही खा, पण ती तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे, याची जाणीव करून देणारा वर्षातील किमान एखादा तरी सण तिच्यासाठी साजरा करा.
दै. स्वाभिमानी छावा
दि. १८ जानेवारी २०२३

खूप छान लेख
ReplyDeleteमस्तच 👍👌
ReplyDelete